Thursday, 3 December 2015

वधूसंशोधनाची गाथा (Marathi Vinodi Katha)

वधूसंशोधनाची गाथा
      प्रातःकाळच्या सकाळी घरपोच पाणी पोचवणा-या नळयोजनांनी आमच्या मात्र तोंडच पाणी पळवत पार झोप उडवून दिली. सकाळप्रहरी गावच्या त्या टोलेजंग घराच्या माडीवरुन पाण्याचे वहन होणा-या पाटास आपल्या हातानी हंडा नावाच्या स्थायूरुपी पदार्थात द्रव साठवून स्वघराकडे नेणा-या या स्त्रीयांना पाहण्यातील मजा आणि ख-या अर्थी आमचा एकूणच रामप्रहरी उठण्याच्या हेतूपुरेस्तर चांगल्या सवयीचा या लोकांनी विकासाच्या नावाखाली घरपोच पाणी पोचवून हिरमोड केला. सदस्थितीत आमचा हेतू केवळ् बाकीच्या कुमारवयीन मुलाप्रमाणे “लाईन मारणे” हा नसून घरातल्या कर्त्या-सवरत्या आमच्या मातोश्रींना घरकामास हातभार लावावा यासाठी स्वतःचे दोनाचे चार हात करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न या द्ररिद्री कंपाळ्करटया लोंकानी हाणून पाडला. आमचं लक्ष केवळ् त्यांच्या हंडयाकडे होते, ज्यात पाणी नावाच द्रव जमिनीवर न सांडवता घरापर्यत आणणारी एखादी काटकसरी सून मिळवी इतका आमचा प्राजंळ् उददेश होता. जर याची आम्हांस पूर्वीच कल्पना आली असती तर आम्ही या 'उन्नती'च्या मॉडलमुळे गावच्या पायवाटेचा रॅम्पवॉक बंद करण्याचा डाव तेव्हाच हाणून पाडला असता.
      पण शेवटी घरास सून मिळावी या हेतून आम्ही आमचा एककलमी कार्यक्रमास बदल करण्याचा प्रस्ताव स्वइच्छेने गुपचूप मजूर केला. या आतापर्यतंच्या आमच्या पाणीदर्शनात आम्हास एक काटकसरी चेहरा सतत ध्यानी राहायला अर्थात तिने पाण्याची काटकसर असं काही विशेष् केलं नव्हतं पण ज्या नजाकतीने पाटाकडून पाणी आणत त्यावरुन शेवटी कलेला महत्तव देण् या एका निकषावर बाकीच्या कमतरता आम्ही माफ केल्या आणि आम्ही चालवल्या या 'मातोश्रीसाठी सून' या एकसूत्री कामात स्वतःस वाहून घेतलं. पाटाकडून पाणी आणण्या-या त्या कुमारिकेचे नाव 'कला' असावं हा नुसता योगायोग नव्हे. ही महिती काढण्यासाठी मात्र आम्हास माडीवरुन पा-यावरच्या त्या टपोरी पो-याच्या संगतीत दोन-तीन दिवस काढावे लागले. त्याच्या त्या असभ्य आरोळ्या आणि “शिटया” नावाच्या एका विचित्र आवाजी प्रयोगांना त्या कुमारिका साथ देत हे मला न उमगलेले कोडेच होते अर्थात स्त्री पुरुष् साद-प्रतिसादाची सामाजिक रेलचेल असावी असं मनास बजावून तेही सोसलं. यांच्या वाचाळ पंक्तीत सुरवातीला न बसण्यामुळे आमची गिणती सज्जन आणि सभ्य लोकांच्या यादीत केव्हाच वरच्या क्रंमाकाला पोचली होती. पण कलेमागील नाव जाणून घेण्यासाठी आम्ही स्वतःस बांधून घेतलेले हे नियम तोडण्याचे धाडस केले. 
     या 'कले'च्या आहारी आम्ही जात आहोत हे कुणालाही कळू नये यासाठी “त्या पांडया तब्येत ठीक नाय… बघून येतो” अश्या खोटया आरोळ्या दबक्या आवाजात मारत आम्हीची स्वारी मग या कलेच्या घरापाशी येवून थांबे. पण ना ती घरातून बाहेर येई ना ती ची सावली. अथक प्रयत्नांनतर आजूबाजूच्या रिकामटेकडया लोकांनी “कलाची परीक्षा हाय आवाज कमी करा टी. व्ही.चा” असा एक गडबडा सुरू केला आणि आमचा जीव भांडयात पडला. विकासाच्या नावाखाली आमच्या स्तुत्य उपक्रमास गाशा गुडांळण्यास भाग पाडणा-या या सरकारने शिक्षणामुळे 'कोडंमारा'च्या घटनाही घडवून आणल्यात…. या सरकारचा जाहीर निषेध. मुळात काही का हो ना आम्ही आमच्या निवडीबददल स्वतःवर जाम खुश् झालो. शिक्षणाचे स्वकर्तुत्वाचे झेंडे दरवर्षी “पढंरपूर” या परीक्षाक्रेंदास जाऊन रोवतच होतो. पण गावातल्या लोकांना माझ्या विठठलभक्तीचा हेवा वाटावा या मागे माझ्या अपयशी ऑक्टोंबर-नोव्हेंबरच्या वा-या कारणीभूत असाव्यात यांची पुसटशी कल्पना ही येऊ दिली नाही अर्थात घरातून मात्र “या खेपेला तरी होतीला का विषय किल्यर” चा जयघोष चाले. घरचे आमच्या पंढरपूरच्या वा-यांना रोखू शकत नाही हा आशावाद आम्ही परीक्षेच्या अपयशाने टिकवून ठेवला होताच. आणि विठठलदर्शनास तितकासा पुरेसा होता.
   गावाकडयाच्या या सून संशोधनाची खबर कुणा एका चांडाळ्याने आमच्या घरापर्यंत पोचवली..” अरं तुमच्या त्या बाब्याला तिकडं त्या सोमेवाडीत काय काम असतं…. बघावं तेव्हा तिकडं घिरटया घालत असतो नुसता” "पण पांडया तर खालच्या वाडीत राहतो ना…" घरच्यांच्या प्रतिप्रश्नाने आम्ही गागंरुनच गेलो. घरच्यांना आमच्या या वार्ताकंनाची आणि वर्तनाची आम्ही मात्र “काय नाय त्या रस्त्यानं शारटकट हाय” असं म्हणत आमच्या गनिमी काव्याची चाहूल होऊ दिली नाही.
      आमच्या या रोजच्या पाळतीचा फायदा कधीनाकधी होणारच हे आम्हास कर्माबाबतच्या वक्तव्यास गीता किती फळाबाबत शाश्वत आहे यांची जाणीव करून देणारं ठरलं. शेवटी परीक्षा नावाच्या जोखडयातून सुटका करवून कलेची झालेली प्रतिमा पाहून आम्हाच्या 'दिला'स थोडासा दिलासा देवून गेली. आम्ही ही मग इतक्या दिवसाच्या प्रतिक्षित संधीचा फायदा घेवून “तू माझ्याशी लग्न करशील काय” या सरळ्मार्गी लव्हवाल्या इन्डींग अन्ड स्टॉर्ट मॅसिंजग वाला प्रश्न विचारला.. पण हिने मात्र “शिवाजी महाराज की” वाला जयजयकारी सुरांचा आवाज काढून आपल्यातल्या सुप्त 'रागां'ना वाव देण्याच्या नावाखाली आजूबाजूच्या लोकांना बिनपैशांचा खेळ दाखवण्याच्या उददेशाने अख्ख्या वाडीस गोळा केले. जमलेल्या त्या टोळ्क्यांनी आमच्या प्रेमिका(प्रेमि? का? काय?) आणि मातृ प्रेमाची(सून मिळवण्यासाठी!) दखल न घेता माझे चरित्रहनन करत अक्षरःशा माझी थू-थू केली आणि आम्ही ती मोठया मनाने स्वीकारली. कलाने केलेल्या कलकलाटी स्वरांनी ‘आई हा मला छेडतोय.. हा हा.. लवकर ये’ अख्या परिवारास (नाही "परिसरास") जमा करून स्त्रीशक्ती विरोधातील अन्यायाचा आर्त स्वरांनी समाचार घेवू लागल्या. “मेल्यांना काय काम नसतात” असं म्हणत शेजारच्या काकीनीं आकसपणे केलेला तरुणपिढीच्या चुकीच्या निरीक्षणास त्याचे वयापरत्वे आलेले 'म्हातारपण' आणि 'सूनेला दिलेला टोमणा' हे जबाबदार असले तरी “तरुणवयात आपण असल्याचं प्रकरणात अडकून प्रेमविवाह केलेल्याची काकूंची आठवण” पुसट होण साहजिकच होत. आम्हा तरुणाचा ज्येष्ठाकडून आदर्श घेण्यासाठी केलेला प्रयत्न वाया जाणार याची पुरती खात्री पटत आली होती.
      शेवटी आमच्या पिताश्रींनी आमच्या उपद्रवी न असणाच्या चांगल्या गुणाची आळ्शीपणाशी संबध लावत एकूणच आमची रवानगी मुबंई नावाच्या कोण्या एका गजबजाटी शहरात करण्याचा निर्णय घेतला पण आम्ही कलेच्या पाणी आणण्याच्या कलेच्या प्रेमात पडलो पंरतु तिच्या आवाजाची ‘पोच’ एकली नसल्यामुळेच मनाने घात केला या मताची स्वतःच पाठराखण करत यापुढे असल्या भानगडीत न पडण्याचा निर्णय मनावर ढकलून मुबंईच्या एका हॉपिसात चिकटण्यासाठी तयार झालो.
      पा-यावरती माझ्या या गनिमी काव्याची चर्चा येत्या काळात रंगेल हे मात्र त्रिवार सत्य आमचं मन मान्य करण्यास तयार होईना. किमान आपल्या पंढरपूरच्या वा-या या केवळ विठठलभक्तीसाठी नसून त्यामागे आपले विद्येच्या देवतेशी असलेले वैर कारणीभूत आहे हे जर कुणास कळले तर आपल्या एकूणच इभ्रतीची पा-यावर मीठ-मिरची लावून चांगलाच चोथा करेपर्यत गप्पा रंगू नयेत यांचीच आम्हास काळजी वाटून राहली होती. "पोरगं वाया गेलं" असं तोडांदारे बोलण्यासाठी म्हणून काही टाळभैरवांनी आम्हाच्या रवानगीच्या दिवशी सकाळपासूनच गावच्या एस.टी स्टॅडला घोळका करुन उभी होती. आणि आम्ही मात्र स्वतःस विवाहाच्या वेळेस वधूची नेमकी अवस्था मंडपातून वराच्या घरच्या दिशेने जाताना काय होत असावी यांचा एकूणच अनुभव घेतच मुंबईस निघालो होतो. थोडीफार नयनांनी साथ दिलीच होती. मग स्वरांनाही राहवलं नाही. आणि ओक्शीबोकाशी या वाक्यप्रचाराचा अर्थ ध्यानी घेत धबधब्यासारखं रडू कोसळलं.
      मात्र वडीलाच्या त्या कणखर हातानी आम्हास इजतीचे पंचनामा करणारी बेरकी थाप पार जाळ् काढत “चल बस मुकाटयान एस.टी.त” म्हणत एस. टीच्या सीटावर आणून बसवलं अनं स्वतःला ही मुबंई दर्शनास मोकळी वाट करुन दिली. आणि गाडीचा धुराळा उडाला… गावकडच्या त्या मातीचा वास केव्हाच दूर सरला… आणि एकाएकी पापणी उघडली… मुबंई आली… मुबंईत बहिणीच्या घरी आमच्या वडीलाच्या संस्करी मनाने “मुलीच्या घरी पाण्याचा थेबं देखील पिणार नाही” ही उपवासाच्या वेळी आर्वजून वापरली जाणारी परंपरा तोडत पार श्रीखंड-पुरीवर ताव मारत केवळ विसळ्ण्यायोग्य ताट ठेवून एक अहंकारी ढेकर सोडत “गावकडं खूप झाली थेर आता सरळ कामाला लावणार हायत तुझे भावोजी” असा धमकीवजा आवाज करीत गावाकडे प्रस्थान केले.
      पंढरीची वारी नियमित पहिलेल्या आमच्या मनास हे दररोज ट्रेनच्या त्या एका छोटयाश्या कोप-यासाठी जो “पावकी-दिडकी” या गणिती संज्ञाची आठवण करीत तथाकथित चौथ्या सीटसाठी चाललेली चढाओढ म्हणजे संतानी दिलेल्या 'विश्वची माझे घर' या संदेशाची पालन करण्याची धडपड आहे हे कळ्ण्यासाठी आम्हास स्वतःची दोन-तीनदा झालेली “उतरना पटकन”, “उतरायचं नाय तर कशाला पुढे डोअरला उभा राहतो” सारख्या काहीश्या मुबंईच्या भाषेतून दिलेल्या प्रामाणिक पण उर्मटी स्वरांनी कळवले. हॉपिसातल्या त्या घडयाळ्यातील काटयाकडे पाळत ठेवत दोन-तीनदा घडयाळ्यातील सेल बदलण्यास प्रवृत करण्यापर्यंत आमचं कामात लक्ष असयाचं पण पुन्हा लोकलवारीचा तो 'विश्वाची घर'वाला प्रवास करण्यास आमचं वैरागी मन तयार नव्हत पण कलाकराला ‘कले’पासून दूर ठेवू शकत नाही हे माझ्यालेखी खरं ठरलं. आणि फायनली कला माझ्याच हॉफिसातच लागली. तिच्या कुण्या एका मामलेदार काकानं तिला इथं आणलं होत. मागच्या आयुष्यातल्या घटना जाग्या असताना देखील मी प्रामाणिक होवून घेतलेला पुढाकार तिला मात्र पुन्हा एकदा स्त्रीशक्तीस आलेले आवाहन वाटून, टाळू लागली. आणि ट्रेनमध्ये दुस-याच्या वर्तमानपत्रात डोकावून वाचलेली “मनापासून केलं तरच शरीर साथ देतं” या लाइन आपल्यासाठीच आहे असं मनात ठरवून टाकलं. पुढे मात्र एकदा वाण्याच्या दुकानातून साबूदाणे पुडीत बांधून घेताना वापरलेल्या पेपरात ती लाईन कोण्यातरी शक्तीवर्धक गोळ्या संदर्भात होत हे वाचून मी मनाला कठोर शब्दात सुनावलं आणि झापलं देखिल. मी कलाला जास्त हातवारे न करता केवळ टकामका पाहत असे तरीदेखिल हॉपिसातली घडयाळ् बदं पडण्यापर्यंत नुकसान होऊ दिलं नाही हे विशेष्.
      रोजच्या परिक्रमांना यश येतचं शेवटी आम्ही नौका-नयन करण्यात यशस्वी ठरलो. “डबा नाय आणला आज का” अस प्रश्नाथिक उत्तराची वाट न बघता कलाने डबा शेअर करण्यास दिला आणि मनातल्या फुलपाखरांना उडवत मी तिचा अर्ध्याहून निम्मा डबा संपवला याचं भान आमच्या हदयपिपासू पोटाने मनाला कळूच दिले नाही. आता मात्र हे रोजच घडू लागलं. बहिणीने दिलेला डबा आम्ही “हॉपिसात लंच देतात हल्ली” असं सांगून बंद केला.
      पर्यावरण व पर्यटन यांस पूरक अशा मुबंईच्या जागा शोधण्यास उदयुक्त करण्या-या आमच्या प्रेमास आता मात्र लग्न नावाच्या समाज मान्य कसोटीस जाण्यावाचून पर्याय नव्हता. मुंबईच्या आमच्या या प्रेमपराक्रमाची कुणकुण कसे ठाऊक पा-यावरच्या पोरापर्यंत पोचली आणि तिथूंन गावच्या घराच्या वेशीपर्यंत. कालपर्यंत माझ्या फटफजितीवर अख्खा दिवस काढणा-या या पारावरच्या पोराचा पारचं हिरमोड झाला. बिचा-या कलेच्या वडिलांनी ही मग मूकसंमती देत दोनाचे चार हात करण्याचा केवळ् कागदी खटाटोप म्हणजे लग्नप्रत्रिका वाटण्यास सुरवात केली. ‘याला म्हणतात जिदद’ असं म्हणून गावच्या काकूंनी आमच्या विवाहचे समर्थन करत “आम्ही ही प्रेमविवाह केला होता हो”…. असं ठासून सांगत आपल्या आठवणीनां उजाळा देत अजूनही आम्ही ज्येष्ठाचा आदर्श घेण्यास कसे पात्र आहोत याचा दाखला दिला. नव्या सुनेचं औक्षण करत मग मातोश्रींनीही नव्या सुनेस संमती दर्शवली. आणि नळयोजनामुळे ग्रामीण स्त्रियांना किती फायदा झाला याचा पाढा वाचत सरकारच्या कामगिरीचं कौतूक करत असतानाचं कलेने ही एका संध्याकाळी लाडिकपणे आम्हाच्या कामगिरीविषयी 'बाप' होणार असल्याचं सांगून भारतीय लोकसंख्यावाढीत विकास होणार की प्रगती यावर हसत प्रश्न टाकत आम्हाला ही खो-खो हसण्यासं भाग पाडले…. ….
-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )